जळगाव

विधान परिषद निवडणूक : ६३० मतदारांसाठी १६४ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा

विधान परिषद निवडणूक : ६३० मतदारांसाठी १६४ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा

३३ भरारी पथके आणि ३३ व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम तैनात

जळगाव | प्रतिनिधी राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. येत्या १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्य नागरिक नव्हे, तर केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांतील ६३० नगरसेवक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध पातळ्यांवर विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

अंमलबजावणी आणि संभाव्य गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने ३३ भरारी पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक पथकात तीन सदस्यांचा समावेश असून एकूण ९९ अधिकारी आणि कर्मचारी जिल्ह्यात विविध भागांत गस्त घालत आहेत. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, तक्रारींची पडताळणी करणे आणि आचारसंहितेचे उल्लंघन रोखणे ही या पथकांची प्रमुख जबाबदारी आहे.

भरारी पथकांच्या कारवायांचे चित्रीकरण आणि पुरावे संकलित करण्यासाठी प्रशासनाने ३३ व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमची नियुक्ती केली आहे. प्रत्येक टीममध्ये दोन सदस्य असून एकूण ६६ कर्मचारी या कामासाठी कार्यरत आहेत. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या कारवाया, जप्ती, सभा तसेच नियमभंगाच्या घटनांचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम या पथकांकडे सोपविण्यात आले आहे

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ही सर्व यंत्रणा कार्यरत करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिस बंदोबस्तासह विविध विभागांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button