
एमआयडीसीत आगीचा रुद्रावतार! केमिकल कंपनी भस्मसात
भीषण आगीत लाखोंचे नुकसान; ८–१० बंबांची मदत, जिल्हाधिकारी व आमदार घटनास्थळी
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव एमआयडीसीमधील एन सेक्टरमध्ये असलेल्या आर्यव्रत केमिकल कंपनीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीचा एवढा रुद्रावतार होता की चार ते पाच किलोमीटर अंतरावरूनही ज्वाळा आणि काळा धूर स्पष्ट दिसत होता.
आगीचे वृत्त समजताच जळगाव महापालिका, जैन इरिगेशन, जामनेर, भुसावळ, वरणगाव, नशिराबाद येथील एकूण ८ ते १० अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. अद्याप नुकसानाची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधिकारी तसेच आमदार राजूमामा भोळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून अग्निशमन यंत्रणेकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.




