जळगावराजकारणसामाजिक

मनपा निवडणूक : चौथ्या दिवशी २४ उमेदवारांचे अर्ज दाखल ; २३५ उमेदवारी अर्जांची विक्री

मनपा निवडणूक : चौथ्या दिवशी २४ उमेदवारांचे अर्ज दाखल ; २३५ उमेदवारी अर्जांची विक्री

चार दिवसांत २,०५४ अर्जांची विक्री

जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी सुरुवातीच्या टप्प्यात इच्छुक उमेदवारांची सावध भूमिका कायम असल्याचे चित्र आहे. चौथ्या दिवशी, शनिवार दि. २७ डिसेंबर रोजी शहरातील १९ प्रभागांमधून एकूण २३५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, त्यापैकी २४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज अधिकृतपणे दाखल केले आहेत. त्यामुळे चार दिवसांनंतर प्रथमच अर्ज दाखलीच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे अर्ज विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दि. २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी तब्बल ७७७ अर्जांची विक्री झाली होती, मात्र एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी ६१८ अर्जांची विक्री झाली तरीही अर्ज दाखल झाले नाहीत. तिसऱ्या दिवशी शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी ४२४ अर्जांची विक्री झाली, मात्र केवळ एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाला होता. चौथ्या दिवशी प्रथमच अर्ज दाखलीचा आकडा दोन अंकी गाठत २४ वर पोहोचला आहे. अवघ्या चार दिवसांत एकूण २,०५४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.

चौथ्या दिवशी प्रभागनिहाय स्थिती
शनिवार दि. २७ डिसेंबर रोजी झालेल्या अर्ज विक्री व दाखलीत प्रभागनिहाय चढ-उतार स्पष्टपणे दिसून आले. प्रभाग क्रमांक ०१ मध्ये १० अर्जांची विक्री झाली असून १ उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ०३ मध्ये २६ अर्जांची विक्री होऊन २ अर्ज दाखल झाले, तर प्रभाग क्रमांक ०७ मध्ये २ अर्जांची विक्री होऊन १ अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून ११ अर्जांची विक्री होऊन ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक १३ मध्ये २३ अर्जांची विक्री झाली असून सर्वाधिक ४ अर्ज दाखल झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १५ मधून ७ अर्जांची विक्री होऊन ४ अर्ज दाखल झाले, तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये १४ अर्जांची विक्री होऊन तब्बल ६ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक १७ मध्ये २१ अर्जांची विक्री होऊन १ अर्ज दाखल झाला, तर प्रभाग क्रमांक १८ मध्ये ८ अर्जांची विक्री होऊन २ अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित अनेक प्रभागांमध्ये अर्ज विक्री झाली असली, तरी अद्याप एकही अर्ज दाखल न झाल्याचे चित्र आहे. चौथ्या दिवशी एकूण २३५ अर्जांची विक्री व २४ अर्जांची दाखल नोंद झाली आहे.

अंतिम दिवसांची प्रतीक्षा; रणधुमाळीला वेग
नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्याने तसेच लहानसहान चुका टाळण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार अंतिम दिवसांची प्रतीक्षा करत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, जळगाव महानगरपालिका निवडणुकीची खरी रणधुमाळी आता वेग घेऊ लागल्याचे संकेत मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button