दुकानासमोरील वेल्डिंग मशिन चोरी; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
तांबापुरा परिसरातील घटना; २५ हजार रुपयांचे नुकसान

दुकानासमोरील वेल्डिंग मशिन चोरी; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
तांबापुरा परिसरातील घटना; २५ हजार रुपयांचे नुकसान
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील तांबापुरा परिसरातील एका वेल्डिंग दुकानासमोर ठेवलेली सुमारे २५ हजार रुपये किमतीची वेल्डिंग मशिन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलीम जुम्मा शाह (वय ५१, रा. तांबापुरा, जळगाव) यांचे त्याच परिसरात वेल्डिंगचे दुकान आहे. दि. ५ जून रोजी रात्री सुमारे १० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी परतले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबीय झोपल्यानंतर अज्ञात चोरट्याने दुकानाबाहेर ठेवलेली वेल्डिंग मशिन लंपास केली.
दि. ६ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता कलीम शाह हे दुकानात आले असता त्यांना वेल्डिंग मशिन जागेवर दिसून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध व चौकशी केली; मात्र मशिनचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यामुळे चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश चौधरी करीत आहेत.




