धरणगाव प्रतिनिधी :- लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रेलरने टँकरला दिलेल्या धडकेत टँकरची टाकी फुटून चाळीस टन कच्चे तेल सांडल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील गांधीधाम येथून कच्चे सोयाबीन तेल भरलेला टैंकर क्रमांक(जीजे-१२, बीएक्स-५०१९) हा अमरावतीला जात असताना महामार्गावरील पाळधी वळण रस्त्याजवळ धुळे येथून सळई घेऊन जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक (एनएल-०१, एजे- ४८२८) ने या टँकरला धडक दिल्याने टँकर उलटून तेलाची टाकी फुटली. यामुळे सर्वत्र तेल साचल्याने नागरिकांनी तेल मिळेल त्या भांड्यांमधून उचलून नेले. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.
याबाबत राजस्थामधील मागुडा येथील टँकर चालक रसूलखान साजनखान याने दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रेलर चालक विजय बळीराम चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाळधी पोलीस करत आहेत.