
शिवसेनेने सोपविली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी!
परभणी व बुलढाणा जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती!
मुंबई/जळगाव प्रतिनिधी शिवसेना पक्षाने पक्षवाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध वरिष्ठ नेत्यांची संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर परभणी आणि बुलढाणा जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांना यापूर्वीही बुलढाणा आणि परभणी जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सांभाळण्याचा अनुभव आहे, आणि त्यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री म्हणून मोठी जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला मी यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.