
पीक-अप वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
मृतांमध्ये नायगाव येथील दोघांचा समावेश
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – बऱ्हाणपूर स्मशानभूमीजवळ रस्त्यावरील पीक-अप वाहनाच्या जोरदार धडकेत नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख भागवत कोळी आणि पुंडलिक कोळी यांचा मृत्यू झाला.
गुरुवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास मुक्ताईनगर–खामखेडा रस्त्यावर ही घटना घडली. दुचाकीवरून जात असताना (क्र. एमएच १९ बीए ३५६) पीक-अप व्हॅन (क्र. एमपी ०९ डीएस ६६८७) ने जोरदार धडक दिली. यात पुंडलिक रामकृष्ण कोळी (वय ५४) आणि भागवत महारू कोळी (वय ६२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही नायगाव येथील रहिवासी असून, भागवत कोळी हे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते.
अपघाताची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबईहून मुक्ताईनगरला धाव घेतली आणि दोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, पोलिसांनी पीक-अपचा चालक धर्मेंद्र नंदकिशोर साहू (रा. इंदूर, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे.
नायगाव येथे दुपारी दोघांचेही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत भागवत कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, तर पुंडलिक कोळी यांच्या मागेही पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे