
घरफोडी प्रकरणातील दोन सराईत चोरटे जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगर येथे नुकत्याच घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५४ हजार रुपये किमतीचे तांब्याचे तार हस्तगत केले असून, उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे.
जगवाणी नगरातील गेटसमोरील दुकान क्रमांक ४ मध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर आणि चैनल गेट तोडून प्रवेश केला. दुकानातून सुमारे १.८५ लाख रुपये किमतीचे तांब्याचे तार चोरीस गेले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित रितेश संतोष आसेरी (वय ४६, रा. रणछोडदास नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व साथीदार रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (वय ३२) याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यालाही रामानंदनगर परिसरातून अटक केली.
मुद्देमाल हस्तगत
दोन्ही आरोपींकडून १०० किलो वजनाचे नवीन व जुने तांब्याचे तार, एकूण ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पो.उ.नि. राहुल तायडे, पो.हे.काँ. गणेश शिरसाळे, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंह पाटील, रवी नरपाळे आणि अक्रम शेख यांनी मोलाची भूमिका बजावली.