गुन्हेजळगावराजकारण

जळगावात महापौरांची अचानक ‘प्लास्टिकविरोधी’ धडक मोहीम; अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई

जळगावात महापौरांची अचानक ‘प्लास्टिकविरोधी’ धडक मोहीम; अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई

सराईत विक्रेत्यांना दुकान सील करण्याचा इशारा; बाजारपेठेत उडाली खळबळ

जळगाव : शहरात पुन्हा वाढत असलेल्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराविरोधात जळगाव महानगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी मोठी धडक कारवाई केली. महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बाजारपेठेत अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून अनेक दुकानांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

महापौर दीपमाला काळे यांनी यापूर्वीच प्लास्टिक बंदीबाबत कठोर निर्देश दिले होते. सुरुवातीला व्यापाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. मात्र गेल्या काही दिवसांत शहरात पुन्हा सर्रास प्लास्टिक वापर सुरू झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. याची गंभीर दखल घेत मंगळवारी सायंकाळी ५ वाजता राजकमल टॉकीज परिसर, तिजोरी गल्ली, अशोक टॉकीज गल्ली, दाणा बाजार, नेताजी सुभाषचंद्र चौक आणि फुले मार्केट परिसरात अचानक तपासणी करण्यात आली.

महापौर स्वतः पायी फिरून तपासणी करत असल्याचे पाहताच अनेक फळ विक्रेते, भाजी विक्रेते, हातगाडी चालक आणि दुकानदारांची धावपळ उडाली. काहींनी प्लास्टिकच्या पिशव्या लपविण्याचाही प्रयत्न केला.

तपासणीदरम्यान अनेक दुकानांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने जागेवरच प्लास्टिक जप्त केले, तर नियम मोडणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी महापौरांनी “ग्राहकांना वस्तू कशात पॅक करून देता?” असा संतप्त सवाल करत विक्रेत्यांना चांगलेच सुनावले.

विशेष म्हणजे, काही दुकानांवर यापूर्वीही दोन वेळा कारवाई झालेली असतानाही पुन्हा प्लास्टिक वापर आढळल्याने महापौरांनी कठोर भूमिका घेतली. जवाहर क्लोथ स्टोअर्स आणि एच. आर. ट्रेडर्स या दुकानांवर प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “यापुढे दुकानात किंवा हातगाड्यावर प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास संबंधित दुकान थेट सील केले जाईल.”

दरम्यान, काही जागरूक व्यापाऱ्यांकडे पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल पिशव्या आणि शासनमान्य जाड प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांचे कौतुकही करण्यात आले. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही महापौरांनी केले.

या कारवाईत नगरसेवक रमेश मतानी, मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, रुपेश भालेराव, महेश ठाकूर, मयूर सपकाळे तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button