आरोग्यगुन्हेजळगावसामाजिक

ओव्हरटेक च्या नादात दोन ट्रक समोरासमोर धडकले! 

ओव्हरटेक च्या नादात दोन ट्रक समोरासमोर धडकले! 

दोन चालक जागीच ठार ; पाळधी तरसोद बायपासवरील घटना

जळगाव: पाळधी-तरसोद बायपास महामार्गाचे अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वीच बुधवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. कचरा फॅक्टरीजवळ दोन ट्रकांची जोरदार समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे दोन्ही ट्रकांचे केबिन चक्काचूर झाले. या दुर्घटनेत दोन चालकांचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गुजरातमधील मोरबीहून टाईल्स घेऊन आंध्रप्रदेशातील खाकीनाडा जाणारा ट्रक (एपी ३९ युएफ ३५९९) बायपासवरून जात होता. या वेळी समोरून आलेल्या दुसऱ्या ट्रकने (जीजे १६ एवाय ००७८) चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करत समोरासमोर धडक केली. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांचे केबिन उद्ध्वस्त झाले.

टाईल्स ट्रकचा चालक एस. के. मौलाली (वय ४०, एरुपालम, तेलंगणा) जागीच ठार झाला. दुसऱ्या ट्रकचा चालकही मृत्यूमुखी पडला. मात्र, मौलालींचा क्लिनर एस. के. जानी ने वेळेत ट्रकमधून उडी मारल्यामुळे जीव वाचवला; तो गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

:
कोळशाने भरलेला ट्रक टाईल्स ट्रकवर अडकला होता. स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि नागरिकांच्या धाडसी प्रयत्नांनंतर जेसीबीच्या साहाय्याने अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर जखमींना बाहेर काढले गेले.

बायपासचे उद्घाटन अद्याप झालेले नसताना चाचणीसाठी वाहतूक सुरू होती. मार्ग एकेरी असूनही दोन्ही बाजूंची वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. स्थानिकांनी रस्त्याचे अपूर्ण रुंदीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावावर नाराजी व्यक्त केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेतले, बचावकार्याला गती दिली आणि वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आले असून, तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button