
भादली येथे माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या, गावात तणावाचे वातावरण
जळगाव प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून, भादली गावात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. शिवसेना (शिंदे गट) चे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास युवराज कोळी हे आपल्या घराबाहेर उभे असताना, तिघा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हत्या झाल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, नातेवाईक व समर्थक रुग्णालयात जमले. संतप्त कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
युवराज कोळी यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा राजकीय वाद आहे की वैयक्तिक दुश्मनी, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पंचनामा केला असून, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.