JCL T-20 स्पर्धेत थरार शिगेला; जामनेर, जळगाव व अमळनेर संघांचे दमदार विजय

JCL T-20 स्पर्धेत थरार शिगेला; जामनेर, जळगाव व अमळनेर संघांचे दमदार विजय
उपांत्य फेरीसाठी चुरस वाढली; फलंदाज-गोलंदाजांची चमकदार कामगिरी
जळगाव, (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित आणि अलरिक इलेक्ट्रिकल्स सहप्रायोजित JCL T-20 क्रिकेट स्पर्धेचा थरार दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यांमध्ये जळगाव कोगटा किंग्स आणि जामनेर सातपुडा हिरोज यांनी दणदणीत विजय मिळवला, तर यापूर्वी सोमवारी रात्री अमळनेर सुहांस जायंट्स संघाने विजयाची नोंद केली होती. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामनेरचा अमळनेरवर ८ गडी राखून विजय
जामनेर सातपुडा हिरोज आणि अमळनेर सुहांस जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात जामनेरने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली. अमळनेरची सुरुवात डळमळीत झाली. शुभम शर्माने ४७ चेंडूत ६० धावांची खेळी करत डाव सावरला, तर रोहित भोई (३२) आणि यशवंत शिंदे (२२) यांनी साथ दिली. अमळनेरचा डाव १९.५ षटकांत १५२ धावांवर आटोपला.
प्रत्युत्तरात जामनेर संघाने आक्रमक फलंदाजी करत १७.४ षटकांतच १५३ धावांचे लक्ष्य पार केले. सामनावीर प्रद्युम महाजन याने ४२ चेंडूत ६९ धावांची शानदार खेळी केली. रवींद्र (३१*) आणि क्रिषी (३०*) यांच्या नाबाद भागीदारीने संघाला सहज विजय मिळवून दिला.
जळगाव कोगटा किंग्सचा रावेरवर सहज विजय
जळगाव कोगटा किंग्स आणि रावेर रॉयल्स यांच्यातील सामन्यात रावेरची फलंदाजी कोसळली. सुरुवातीला यश नहर (९), तौसीफ मिर्झा (०) आणि संदेश (९) बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला. अशपाक शेख (४५) आणि प्रज्वल राजपूत (१७) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रावेरने २० षटकांत १४३ धावा केल्या.
जळगाव संघाकडून जगदीश झोपे आणि बिपिन चावरे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात जळगाव कोगटा किंग्सने १५.१ षटकांतच १४६ धावा करत सामना जिंकला. ओम भोसले (६४*) आणि बिपिन चांगरे (५२) यांच्या दमदार खेळीमुळे विजय सुलभ झाला. बिपिन चांगरे सामनावीर ठरला.
अमळनेरचा रावेरवर २०१ धावांचा डोंगर
सोमवारी झालेल्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्सने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २०१ धावांचा मोठा डाव उभारला. रणजीत निकम (५५), मानव टीब्रेवाला (५४) आणि ऋषी यादव (३७) यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
रावेर रॉयल्सचा डाव १६४ धावांवर थांबला. संदेश सुरवाडे (४७) आणि तुषार चोरडिया (४६) यांनी झुंज दिली. मोहंमद सैफने २ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. रणजीत निकम सामनावीर ठरला.
उद्याचे सामने (दि. २२ एप्रिल):
सकाळी ८.३० : रावेर रॉयल्स विरुद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज
दुपारी ३.०० : अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स
सायंकाळी ७.३० : जळगाव कोगटा किंग्स विरुद्ध जामनेर सातपुडा हिरोज



