
नशामुक्त युवा – विकसित भारताची जळगावात जिल्हास्तरीय समन्वय बैठक संपन्न; पुढील १०० आठवड्यांचा कृती आराखडा निश्चित
जळगाव: जळगाव येथील जिल्हा नियोजन सभागृहात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ अभियानाची जिल्हास्तरीय समन्वय बैठक उत्साहात पार पडली. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि व्हर्च्युअल उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नशामुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे भरीव योगदान राहावे, या उद्देशाने आगामी १०० आठवड्यांसाठीचा सविस्तर कृती आराखडा या बैठकीत निश्चित करण्यात आला.
या बैठकीला व्यासपीठावर राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने आदी मान्यवर उपस्थित होते.
या महत्त्वाच्या बैठकीस जिल्ह्यातील विविध आध्यात्मिक व शैक्षणिक संस्थांचे विश्वस्त, महाविद्यालयांचे प्राचार्य, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते. तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून त्यांना राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प याप्रसंगी सोडण्यात आला.




