गुन्हेजळगावधार्मिकराजकारणशासकीयसामाजिक

अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारे पत्रकार जकी अहमद

पत्रकारितेतील जिद्द, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी प्रवास!

अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारे पत्रकार जकी अहमद

पत्रकारितेतील जिद्द, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी प्रवास!

२०१२ मध्ये पत्रकारितेची सुरुवात; २०२४ मध्ये ‘खान्देश टाइम्स’ न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनल, तर २०२६ मध्ये साप्ताहिक वृत्तपत्राची स्थापना

अभिष्टचिंतन विशेष I खानदेश टाइम्स न्यूज

जळगावच्या माध्यम क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने धडपडणारे, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे ‘खान्देश टाइम्स’चे मुख्य संपादक जकी अहमद यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रभावी मार्ग आहे, ही भूमिका त्यांनी आपल्या कार्यातून अधोरेखित केली आहे.

पार्टटाइम पत्रकारितेपासून पूर्णवेळ पत्रकारितेपर्यंतचा प्रवास

जकी अहमद यांनी २०१२ मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीला पार्टटाइम पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी या क्षेत्रातील बारकावे समजून घेतले. बातम्यांचे संकलन, घटनांचा मागोवा, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या प्रभावीपणे मांडणे, यांचा अनुभव घेत त्यांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवली. २०१८ पासून त्यांनी पूर्णवेळ पत्रकारितेत स्वतःला झोकून दिले. त्यानंतर समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याच्या ध्येयाने त्यांनी आपल्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप दिले.

या प्रवासात त्यांना ज्येष्ठ पत्रकार आणि छायाचित्रकार वसीम खान यांचे मार्गदर्शन लाभले. जळगावच्या माध्यम क्षेत्रात छायाचित्रकार म्हणून वेगळी ओळख निर्माण केलेल्या वसीम खान यांनी जकी अहमद यांना पत्रकारितेत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. सध्या वसीम खान यांचे ‘जळगाव मीडिया’ हे न्यूज पोर्टलही कार्यरत आहे.

त्यानंतर ‘महापोलीस न्यूज’चे मुख्य संपादक चेतन वाणी यांच्याकडूनही जकी अहमद यांना पत्रकारितेतील विविध पैलू शिकण्याची संधी मिळाली. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष कामातून मिळालेला अनुभव आणि स्वतःच्या ध्येयावरील ठाम विश्वास यांच्या बळावर त्यांनी पत्रकारितेतील वाटचाल सुरू ठेवली. या प्रवासात त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

इंडिया आप तक’पासून ‘खान्देश टाइम्स’पर्यंतची भरारी

जकी अहमद यांनी सुरुवातीच्या काळात ‘इंडिया आप तक’ न्यूज चॅनलसाठी तब्बल पाच वर्षे फ्रीलान्स पत्रकार म्हणून काम केले. या काळात त्यांना वृत्तसंकलन, घटनास्थळावरील परिस्थितीचे आकलन, बातम्यांची मांडणी आणि जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याचा अनुभव मिळाला.

कालांतराने स्वतःचे न्यूज चॅनल, न्यूज पोर्टल आणि वृत्तपत्र असावे, अशी संकल्पना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. त्यानंतर त्यांनी स्वतःचे ‘स्वदेशी लाईव्ह ‘ नावाचे न्यूज पोर्टल चालू केले. यानंतर काहीतरी वेगळे करण्याच्या ध्येयातून २०२४ मध्ये त्यांनी ‘खान्देश टाइम्स’ या नावाने स्वतःचे यूट्यूब चॅनल आणि न्यूज पोर्टल सुरू केले. त्यानंतर २०२६ मध्ये ‘खान्देश टाइम्स’च्या साप्ताहिक वृत्तपत्राची सुरुवात करून त्यांनी आपल्या माध्यमविश्वाचा विस्तार केला.

स्वतःची ओळख निर्माण करताना केवळ प्रसिद्धी मिळवणे हा त्यांचा उद्देश राहिला नाही, तर सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणे आणि प्रशासनापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवणे, हेच त्यांच्या पत्रकारितेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर, अर्ध्या रात्री धावून जाणारा पत्रकार

जकी अहमद हे स्वस्थ बसणारे पत्रकार नसून त्यांची सामाजिक बांधिलकी बद्दल असलेली आत्मीयता त्यांच्या कार्यातून ठळकपणे दिसून येते. अर्ध्या रात्री एखादा जळगाव शहरा नजीक किंवा जळगाव शहरात अपघात घटना घडामोडी घडल्यास तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्वात आधी रुग्णाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी ते कायम अग्रेसर राहतात. पत्रकार प्रीमियर लीग च्या माध्यमातून गेल्या दोन वर्ष पासून त्यांनी पोलीस अधिकारी शासकीय अधिकारी आणि पत्रकार यांचा समन्वय साधून योग्य नियोजनाद्वारे यशस्वी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्यासाठी तातडीने ते तत्पर असतात. हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा कायम राहावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शनिपेठ सारख्या संवेदनशील भागात वसीम खान चेतन वाणी यांच्या सहकार्यातून हिंदू एकात्मतेचा संदेश ईद-ए-मिलाद कार्यक्रमातून दरवर्षी दिला जातो. याशिवाय परिसरात शांतता कमिटीची बैठक, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, अन्य सार्वजनिक उपक्रम यात जकी अहमद यांचा हिरहिरीने सहभाग घेऊन ते अग्रेसर असतात हीच त्यांच्या कार्याची खासियत आहे.

मनमिळाऊ स्वभावातून जपलेली माणुसकीची नाती

जळगाव महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचारी, तसेच क्रीडा, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती, उद्योजक, व्यापारी आणि विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी जकी अहमद यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत.

हे संबंध केवळ व्यावसायिक स्वरूपाचे नसून त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाचे, सर्वांशी आपुलकीने संवाद साधण्याच्या वृत्तीचे आणि नागरिकांच्या प्रश्नांविषयी असलेल्या तळमळीचे प्रतीक आहेत. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे समजून घेणे, सामान्य माणसाच्या अडचणी जाणून घेणे आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी शक्य ते प्रयत्न करणे, या वृत्तीमुळे त्यांनी माध्यम क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

बातम्यांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा

पत्रकारितेच्या माध्यमातून जकी अहमद यांनी अनेक घटना आणि घडामोडी समाजासमोर आणल्या आहेत. नागरिकांच्या समस्या, अन्यायाच्या घटना आणि सार्वजनिक हिताचे विषय प्रभावीपणे मांडत त्यांनी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वृत्तांकनाची दखल शासन आणि प्रशासन स्तरावर घेतली गेल्याचेही त्यांच्या वाटचालीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

अल्पावधीत त्यांनी साधलेली ही प्रगती नव्याने पत्रकारितेत येणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मर्यादित साधनांपासून सुरुवात करून स्वतःचे न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनल आणि साप्ताहिक वृत्तपत्र उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जिद्द, सातत्य, मेहनत आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेचे दर्शन घडवतो.

दसरा-विजयादशमीच्या मुहूर्तावर अन्यायाविरुद्ध लढण्याचा संकल्प

आज, विजयादशमी आणि दसऱ्याच्या मंगलमय पर्वावर जकी अहमद यांचा वाढदिवस साजरा होत आहे. असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय व्हावा, या विजयादशमीच्या संदेशाला साजेसा संकल्प त्यांनी आपल्या पत्रकारितेतून जपला आहे. आगामी काळातही नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध राहून अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवत राहण्याचा त्यांचा निर्धार आहे.

‘खान्देश टाइम्स’ समूहाच्या माध्यमातून भविष्यातही समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे, सर्वसामान्यांच्या अडचणी संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याचे आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. पत्रकारितेतील ही सामाजिक बांधिलकी अधिक व्यापक व्हावी आणि त्यांच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नांना यश लाभावे, हीच अपेक्षा.

वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

पत्रकारितेच्या क्षेत्रात जिद्दीने वाटचाल करणारे, सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे आणि आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणारे ‘खान्देश टाइम्स’चे मुख्य संपादक जकी अहमद यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि उत्तरोत्तर यश लाभो. त्यांच्या लेखणीतून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे घडत राहो. त्यांच्या प्रत्येक चांगल्या संकल्पाला यश मिळो आणि अन्यायाविरुद्धचा त्यांचा आवाज अधिक बुलंद होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

शुभेच्छुक :
चेतन वाणी (संपादक महापोलीस न्यूज )/वसीम खान (संपादक जळगाव मीडिया न्यूज)

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button