
जळगावात दरोड्याच्या तयारीत पाच जण जेरबंद; शस्त्रसाठ्यासह ९.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, सुरा, कोयता आणि मास्क हस्तगत; पिंप्राळ्यात पहाटे पोलिसांची धडक कारवाई
जळगाव, प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा परिसरात चारचाकी वाहनातून शस्त्रांसह संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असल्याचा संशय असलेल्या पाच जणांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली. रविवारी (११ ऑक्टोबर) पहाटे २.३० वाजेच्या सुमारास भवानी माता मंदिर ते सिल्क मिलसमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, एक सुरा, एक कोयता, चार मोबाईल, सहा मास्क आणि चारचाकी वाहनासह एकूण ९ लाख ७२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील पाचही जणांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व त्यांच्या पथकाला पिंप्राळा परिसरात एका चारचाकी वाहनातून काही जण शस्त्रांसह संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनात पाच जण आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत वाहनाची झडती घेतली असता शस्त्रांसह दरोड्यासाठी वापरले जाऊ शकणारे साहित्य आढळून आले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अरविंद विजय कांबळे (वय २६, रा. कासोळा, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम), खुशाल गजानन बोरसे (वय ३०, रा. खडका रोड, भुसावळ), सोनू महेंद्र जयस्वाल (वय २७, रा. सातेवाडी नाका, वसई पूर्व, जि. पालघर), राणू उर्फ ओमकार अंकुश भदरगे (वय २९, रा. शास्त्रीनगर, ठाणे पश्चिम) आणि संदीप बबन लोंढे (वय ३५, रा. शंभर फुटी रोड, जळगाव) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी संशयितांकडून दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, धारदार सुरा, कोयता, मिरची पावडर, पाच फूट लांबीच्या दोन दोऱ्या, चार मोबाईल, प्लास्टिकचा दांडा आणि सहा मास्क जप्त केले. यासोबत सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ७२ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद गवते यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अटकेतील संशयितांचा नेमका उद्देश काय होता आणि ते आणखी कोणत्या गुन्ह्यांत सहभागी आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.




