
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २१ रिक्षा चालकांवर कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांकडून होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत शनिवारी (१० मे) सुभाष चौक परिसरात कारवाई केली. या कारवाईत २१ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या वाहनांची व कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये रिक्षा चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचा सर्रास भंग केला जात असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. रस्त्यांवर कुठेही रिक्षा थांबवणे, वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक अडवणे, आणि काही वेळा प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा तक्रारी वाहतूक शाखेकडे वारंवार प्राप्त होत होत्या.
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागाने १० मे रोजी शहरात मोहीम राबवत सुभाष चौक परिसरात ही कारवाई केली. यामध्ये रिक्षा उभ्या करण्याची जागा, चालू वाहतुकीत अडथळा निर्माण होतो का, चालकांकडे वैध परवाना, कागदपत्रे व गणवेश आहेत का, याची कसून तपासणी करण्यात आली.
कारवाई केलेल्या रिक्षा चालकांकडे असलेले प्रलंबित दंड रकमेचीही तपासणी केली जात असून, त्यानुसार त्यांच्याकडून सर्व दंडाची वसुली केली जाणार आहे. वाहतूक शाखेने पुढील काळातही अशा प्रकारच्या मोहिमा राबविण्याचा इशारा दिला आहे.