
जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क : काही वास्तू केवळ दगड-विटांनी उभ्या राहत नाहीत… त्या उभ्या राहतात असंख्य माणसांच्या आठवणींवर, भावनांवर आणि संघर्षांच्या इतिहासावर! जळगावच्या बळीराम पेठेतील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाची “वसंत स्मृती” ही अशीच एक वास्तू. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखाची, बैठकींची, निवडणूक रणनीतींची, राजकीय चढ-उतारांची आणि असंख्य आठवणींची साक्षीदार असलेली ही वास्तू आता जीर्ण झाल्याने नूतनीकरणासाठी पाडण्यात येत आहे.
वास्तू आता दिसणार नाही… भिंती राहणार नाहीत… दालनांमध्ये कार्यकर्त्यांची लगबग दिसणार नाही… पण “वसंत स्मृती”ची स्मृती मात्र असंख्य कार्यकर्त्यांच्या मनातून कधीच पुसली जाणार नाही.
टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वास्तू
शंभर वर्षांहून अधिक जुना इतिहास लाभलेल्या या वास्तूला ऐतिहासिक वारसा लाभला होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने ही वास्तू पावन झाल्याचे सांगितले जाते. काळाच्या ओघात ही वास्तू जीर्ण झाली आणि तिचे नूतनीकरण करणे अपरिहार्य झाले.
आज तिच्यावर हातोडा चालत असताना, अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र गेल्या तीन दशकांचा इतिहास जिवंत होत आहे.
12 बाय 25 च्या खोलीपासून “वसंत स्मृती”पर्यंतचा प्रवास
एक काळ असा होता की बळीराम पेठेतील बळीराम मंदिराजवळील चांदोरकरांच्या वाड्यातील अवघ्या 12 बाय 25 फुटांच्या एका खोलीत तत्कालीन जनसंघाचे कार्यालय सुरू होते. 1980 पासून त्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यालय सुरू झाले.
कार्यालयाची परिस्थिती अत्यंत साधी होती. अधूनमधून जमीन शेणाने सारवावी लागायची. जागा कार्यालयासाठी सोयीची नव्हती; मात्र कार्यकर्त्यांची निष्ठा आणि पक्षाविषयीचा जिव्हाळा एवढा मोठा होता की त्या छोट्याशा जागेतही संघटनात्मक कामाचा उत्साह कायम असायचा.
1991 मध्ये डॉ. गुणवंतराव सरोदे खासदार झाल्यानंतर 243, बळीराम पेठ येथे तहसील कार्यालयासमोरील गल्लीत तीन खोल्यांच्या विनामोबदला उपलब्ध झालेल्या जागेत खासदारांचे संपर्क कार्यालय आणि भाजपचे जिल्हा कार्यालय सुरू झाले. बडोदा येथील रहिवासी असलेल्या श्रीमती सुशीलाबाई गोडगस्ते यांनी आपली जागा पक्षाच्या कामासाठी विनामोबदला उपलब्ध करून दिली होती.
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र बनलेले कार्यालय
1994 मध्ये उत्तर महाराष्ट्राचे पहिले विभाग संघटन मंत्री म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती झाल्यानंतर याच जागेचे रूपांतर भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयात झाले.
विनोद तावडे, खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे, तत्कालीन जिल्हाध्यक्ष एकनाथराव खडसे, जिल्हा संघटक स्व. चंद्रकांत मेंडकी, जिल्हा सरचिटणीस नारायणराव चौधरी, जामनेरचे तत्कालीन सरपंच गिरीश महाजन, डॉ. राजेंद्र फडके, ॲड. किशोर काळकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा पक्षाच्या बैठकीनिमित्ताने येथे नियमित राबता असायचा.
1995 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपने मिळवलेल्या यशाची मुहूर्तमेढ जणू याच कार्यालयातून रोवली गेली, अशी आठवण अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात आजही ताजी आहे.
“आपले स्वतःचे कार्यालय असावे…” या स्वप्नाचा शोध
1995 नंतर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत गेली आणि आता स्वतःच्या मालकीची भव्य जिल्हा कार्यालयाची वास्तू असावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा निर्माण झाली.
जागेच्या शोधाची ही कहाणीही तितकीच रंजक आहे. जिल्हा सरचिटणीस ना. वी. चौधरी यांच्यासोबत जुन्या कार्यकर्त्यांनी छोट्या लूना मोपेडवरून जळगाव शहरात अनेक जागा पालथ्या घातल्या. नव्यानेच पक्षाच्या संपर्कात आलेले उद्योजक सुनील बढे यांनीही काही जागा सुचवल्या.
कुठे परिसर योग्य नव्हता, कुठे जागा मनाजोगती नव्हती, तर काही जागांच्या किमती अवाच्या सव्वा होत्या. अखेर बळीराम पेठेतील पूर्वीच्या कोल्हटकरांच्या वाड्याची जागा सर्वांच्या पसंतीस उतरली.
अटलजींची सभा आणि “वसंत स्मृती”चा जन्म
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अधिवेशन जळगावमध्ये घेण्याचे निश्चित झाले. या अधिवेशनाला तत्कालीन पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी उपस्थित राहणार असल्याची बातमी समजताच संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने अटलजींना 51 लाख रुपयांचा गौरव निधी अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कोऱ्या पावती पुस्तकांसोबत 5, 10 आणि 50 रुपयांची कूपने छापण्यात आली. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक, अटलजींचे चाहते आणि भाजपचे कार्यकर्ते अशा समाजातील विविध घटकांनी स्वेच्छेने निधी दिला.
जळगावच्या जी.एस. ग्राउंडवर—आजच्या शिवतीर्थ मैदानावर—झालेल्या विराट सभेत अटलजींना 51 लाख रुपयांचा गौरव निधी अर्पण करण्यात आला.
आणि या निधीतून बळीराम पेठेतील भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या इमारतीला आवश्यक डागडुजी व रंगरंगोटी करून नवे रूप मिळाले.
महाराष्ट्रात जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी करणारे स्व. वसंतराव भागवत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या वास्तूला नाव देण्यात आले—
“वसंत स्मृती!”
या कार्यालयाचे उद्घाटन स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष स्व. प्रा. ना. स. फरांदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ती वास्तू नव्हती… ती एक भावना होती!
1995 पासून जळगाव जिल्ह्यात भाजपचा राजकीय आलेख उंचावत गेला. लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सहकारी संस्था, बाजार समित्या, नगरपालिका आणि जळगाव महापालिका अशा विविध पातळ्यांवरील राजकीय घडामोडींमध्ये पक्षाने आपली संघटनात्मक ताकद वाढवली.
या संपूर्ण प्रवासात “वसंत स्मृती” ही केवळ कार्यालयाची इमारत नव्हती.
ती कार्यकर्त्यांसाठी एक विश्वासाची जागा होती.
ती चर्चेची जागा होती.
ती संघर्षाची जागा होती.
ती विजयाच्या जल्लोषाची जागा होती.
आणि अनेकांसाठी ती राजकीय आयुष्याची पहिली पायरी होती.
पक्षाच्या बैठका, निवडणुकांची रणनीती, नेत्यांचे दौरे, उमेदवारांच्या मुलाखती, कार्यकर्त्यांची लगबग आणि राजकीय निर्णयांच्या चर्चा… या सगळ्यामुळे या वास्तूत कायम चैतन्य असायचे.
वसंत स्मृतीमध्ये प्रवेश करतानाच एखाद्या जुन्या मंदिरात प्रवेश केल्यासारखी अनुभूती यायची, अशी भावना अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात आजही आहे.
अनेक राजकीय निर्णयांची साक्षीदार
गेल्या तीन दशकांत जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींची ही वास्तू साक्षीदार राहिली.
काही निर्णयांनी राजकीय समीकरणे बदलली, काही निर्णयांनी नवीन नेतृत्व घडवले, तर काही बैठकींमधून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली.
या वास्तूने अनेक कार्यकर्त्यांना राजकीय व्यासपीठ दिले आणि अनेकांना पुढे जाण्याची संधी मिळाली.
म्हणूनच आज ही वास्तू पाडली जात असताना, अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात एकच भावना आहे—
“इमारत पडली… पण आठवणी कशा पाडणार?”
जीर्ण वास्तूला निरोप; नव्या पर्वाची चाहूल
काळाच्या ओघात “वसंत स्मृती”ची इमारत जीर्ण झाली होती. त्यामुळे तिचे पाडकाम करून त्याच जागेवर नव्या, सुसज्ज आणि भव्य भाजप जिल्हा कार्यालयाची इमारत उभारण्याचे नियोजन आहे.
नवी इमारत आधुनिक असेल. नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांसाठी नव्या सुविधा असतील. भविष्यातील राजकीय आणि संघटनात्मक कामकाजाला अधिक व्यापक जागा मिळेल.
मात्र नव्या इमारतीच्या पायाभरणीत जुन्या “वसंत स्मृती”च्या आठवणींचाही सुगंध असेल.
जुन्या भिंती कोसळल्या असतील…
पण त्या भिंतींनी ऐकलेल्या घोषणा, पाहिलेल्या बैठका, अनुभवलेले संघर्ष आणि साक्षीदार राहिलेल्या असंख्य आठवणी आता कार्यकर्त्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.
आज “वसंत स्मृती”ला निरोप देताना एका जुन्या पर्वाचा शेवट होत आहे; पण त्याच वेळी नव्या पर्वाची सुरुवातही होत आहे.
कदाचित उद्या याच जागेवर नवी “वसंत स्मृती” उभी राहील…
नवी वास्तू असेल, नवी पिढी असेल, नवे चेहरे असतील;
पण जुन्या “वसंत स्मृती”च्या आठवणींचा वारसा मात्र तसाच जिवंत राहील.
कारण काही वास्तू पाडल्या जातात…
पण त्यांच्याशी जोडलेल्या “स्मृती” कधीच पाडता येत नाहीत!


