संतप्त नागरिकांनी उभा डंपर पेटवून दिला
जळगाव प्रतिनिधी I :- दुचाकी वरून मामासोबत जेवणाचे पार्सल घेऊन जाणाऱ्या एका नऊ वर्षीय मुलगा डंपरच्या धडकेत ठार झाल्याची दुर्दैवी घटना २५ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता सुमारास कालिंका माता चौक परिसरात घडली असून संतप्त नागरिकांनी उभा डंपर पेटवून दिला. या घटनेत मुलाचा मामा आणि बहीण जखमी झाले आहेत.
योजस धीरज बऱ्हाटे (वय-9 रा.लीला पार्क, अयोध्या नगर)असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. योजस हा मुलगा आपले आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय 13) यांच्यासोबत आयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी 25 डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते.
संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे भाची भक्ती आणि भाचा योजससोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युजस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला, तर त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. जमाव आक्रमक होत असल्याचे बघून पोलिसांनी जमावाला पंगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. घटनास्थळी जळगाव शहराचे आमदार राजू भोळे यांनी देखील नागरिकांसोबत बराच वेळ ठिय्या आंदोलन केले.