
उंटांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले ;९ उंटांची सुटका
सावदा पोलिसांनी दोन टप्प्यात केली तब्बल 30 उंटांची सुटका
जळगाव (प्रतिनिधी): सावदा पोलिसांनी वेळीच केलेल्या धडक कारवाईमुळे क्रूरपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या ३० उंटांचे प्राण वाचले आहेत. या उंटांना उपचार आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी कुसुंबा येथील ‘अहिंसा तीर्थ – रतनलाल सी. बाफना गोशाळा’ येथे हलवण्यात आले आहे. पोलिसांच्या या संवेदनशील कारवाईचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.गोपनीय माहितीवर कारवाई:
सावदा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. १६ मे रोजी पहिल्या टप्प्यात पोलिसांनी दोन मोठ्या वाहनांमधून अमानुषपणे वाहतूक होत असलेल्या २१ उंटांची (१७ नर आणि ४ मादी) सुटका केली. यापैकी १० ते १२ उंट गंभीर जखमी अवस्थेत आढळले. उंटांना दोरांनी बांधून अत्यंत क्रूर पद्धतीने वाहनांमध्ये कोंबण्यात आले होते.दुसऱ्या टप्प्यात ९ उंटांची सुटका:
२४ मे रोजी पहाटे ३ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाला पुन्हा माहिती मिळाली. एका ट्रकमधून उंटांची क्रूर वाहतूक होत असल्याचे समजताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रक अडवला. तपासणीत उंटांच्या पायांना दोरांनी घट्ट बांधून त्यांची वाहतूक होत असल्याचे आढळले. या कारवाईत आणखी ९ उंटांची सुटका करण्यात आली.वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई:
ही संपूर्ण कारवाई वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९६० अंतर्गत करण्यात आली. सुटका केलेल्या उंटांना कुसुंबा येथील ‘अहिंसा तीर्थ – रतनलाल सी. बाफना गोशाळा’ येथे हलवण्यात आले. गोशाळेचे संचालक सुशीलकुमार बाफना यांनी उंटांसाठी अन्न, पाणी आणि वैद्यकीय उपचारांची तातडीने व्यवस्था केली असून, त्यांची काळजी घेतली जात आहे.