
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम; ५ लाखांहून अधिक दंड वसूल
जळगाव प्रतिनिधी: जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’ (All Out Operation) मोहीम राबवली. सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत अवघ्या चार तासांच्या या धडक कारवाईत पोलिसांनी जिल्ह्याभरात अनेक गुन्हे नोंदवून मोठे यश मिळवले आहे.
या विशेष मोहिमेत तब्बल २६९ पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. या व्यापक कारवाईदरम्यान, २,४५८ हून अधिक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली, तसेच ८२ तडीपार आरोपींची चौकशी करण्यात आली.
या मोहिमेत नोंदविण्यात आलेल्या प्रमुख गुन्ह्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- दारूबंदी कायद्यांतर्गत: ९० गुन्हे
- जुगार कायद्यान्वये: ३४ गुन्हे
- अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये: २२ गुन्हे
- शस्त्र कायद्यान्वये: १ गुन्हा
- महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत: १४ प्रकरणे
एकूण १४८ वॉरंट बजावण्यात आले. त्याचबरोबर, जिल्ह्यातील १३५ हॉटेल्स आणि लॉजेसची अचानक तपासणी करण्यात आली.
मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करत तब्बल ६७१ प्रकरणांमध्ये दंड आकारला. या कारवाईतून पोलिसांनी एकूण ₹५ लाख १० हजार ३५० रुपयांचा प्रचंड मोठा दंड वसूल केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गुन्हेगारीवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष कारवाया यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.




