
कजगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत चार घरफोड्या
रोख व सोन्याचा ऐवज लंपास
कजगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील कजगाव, पासर्डी आणि घुसर्डी या गावांमध्ये बुधवारी (२६ जून) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरांवर धाड टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. या सलग घडलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गजबजलेल्या कजगावमधील राणा पॉइंट चौकातील सुदर्शन भिला अमृतकर यांच्या घरातून चोरट्यांनी मोठी रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पासर्डी गावातील भारत नगर येथील अर्जुन विठ्ठल पाटील यांच्या घरातून वीस हजारांची रोकड लांबवली. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या घुसर्डी गावात बळीराम हरी जाधव आणि निवृत्ती भास्कर देवकर यांच्या घरांमध्येही घरफोडी करून चोरट्यांनी रोख व सोन्याचा ऐवज चोरला.
या चारही घटना एकाच रात्रीत घडल्याने चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही परिसरात घरफोड्या व दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, एकाही प्रकरणाचा तपास लागलेला नाही. त्यामुळे भडगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.
चोरट्यांनी शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी खत व मजुरीसाठी साठवून ठेवलेली रोकड चोरल्याने त्यांच्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. शेतीच्या मशागतीसाठी ठेवलेले पैसे चोरीला गेल्यामुळे आता खत, बी-बियाणे व मजुरीसाठी निधी कुठून आणावा या चिंतेत शेतकरी सापडले आहेत.
या घटनांनंतर परिसरातील ग्रामस्थांत तीव्र नाराजी असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, सीसीटीव्ही व्यवस्था सक्षम करावी आणि चोरट्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या चारही घरफोड्यांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.