
कुसुंबा शिवारात पाठलाग करून तरुणाला अटक; २० हजारांचा गावठी कट्टा जप्त
जळगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील कुसुंबा येथील साई सिटी शिवारात एमआयडीसी पोलिसांनी एका तरुणाला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पथकाने कुसुंबा शिवारात शोधमोहीम राबवली. यावेळी संशयास्पदरित्या फिरणारा तरुण चेतन वसंत देऊळकार (वय २२, रा. कुसुंबा, ता. जळगाव) पोलिसांना दिसला. विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या घरात गावठी कट्टा असल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या घरातून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल तायडे, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर आणि विशाल कोळी यांनी केली. पुढील तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.