
महावितरणची विज चोरांविरुद्ध धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेरात 200 जणांवर कारवाई
जळगाव – प्रामाणिक वीज ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठ्याची सोय सहज उपलब्ध करता यावी म्हणून धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेर तालुक्यात महावितरणच्या धरणगाव विभागातर्फे वीज चोरांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत विभागातील 200 ग्राहकांविरुध्द कारवाई करण्यात आल्याची माहीती धरणगाव विभागीय कार्यालयाने दिली.
विजेचे मीटर बायपास करणे, वाहिण्यांवर आकडे टाकणे किंवा मीटरमध्ये फेरफार करुन चोऱ्या होत असल्याने प्रामाणिक ग्राहकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीवरुन मागील दोन दिवसांपासून धरणगाव विभागीय कार्यालयाने 250 कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी 50 पथके गठीत करुन मोहीम राबविली.
मोहीमेत 50 पथकांनी एकूण 930 ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. त्यात 52 जणांनी आकडे टाकूण व मीटरला बायपास करुन वीजचोरी केल्याचे आढळून आले. सुमारे 150 जणांनी मीटरमध्ये फेरफार करुन विजेचा गैरवापर केला. त्या प्रकरणी त्यांच्यावर भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 व 135 नुसार कारवाई करण्यात येत असल्याचे विभागाने कळविले आहे.