
घराच्या वाटणीवरून तरुणाची निर्घुण हत्या
बाप आणि भाऊ जेरबंद, भडगाव तालुक्यातील बाळद येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पित्याने आपल्या सख्ख्या मुलाचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द गावात मंगळवार, ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता उघडकीस आली. या प्रकरणात मुलाचा भाऊही सहभागी असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) असे असून, त्याने घराच्या वाटणीत आपला हक्क मागितला होता. यावरून वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भाऊ भारत शिंदे (वय २२) यांनी त्याच्याशी वाद घालून त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर आणि छातीवर जबर मारहाण करत त्याचा जागीच अंत केला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी गावचे पोलीस पाटील सुनील लोटन पाटील (वय ५४) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेने बाळद खुर्द गावात हळहळ व्यक्त होत असून, केवळ घराच्या वाटणीसारख्या किरकोळ कारणावरून मुलाचा जीव गेला, ही गोष्ट अंतःकरण हादरवणारी आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस नाईक महेंद्र चव्हाण करत आहेत.