
तापी नदीत मामा-भाच्याचा बुडून मृत्यू, जालन्यातील दोन कुटुंबांवर शोककळा
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील तापी नदी पात्रात बुधवारी सकाळी अंघोळीसाठी गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये रामराजे नंदलाल नाटेकर (वय ५५) आणि आर्यन नितीन काळे (वय २१) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे जालना व भुसावळ शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या पेंढारवाडा, भुसावळ येथे संदीप हरिश्चंद्र रणधीर यांच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते.
बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास रामराजे नाटेकर आणि त्यांचा भाचा आर्यन काळे तापी नदीत अंघोळीसाठी गेले. अंघोळ करताना अचानक पाय घसरल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि काही क्षणांतच नदीपात्रात बुडाले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेतली आणि दोघांनाही बाहेर काढून भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन चौधरी यांनी तपासणीनंतर दोघेही मृत झाल्याचे घोषित केले.
या अपघाती मृत्यूमुळे नातेवाइकांमध्ये शोककळा पसरली आहे. पुढील तपास भुसावळ शहर पोलीस करीत आहेत.