
वाकडी येथे घरफोडीत दोन लाख ४० हजारांचा ऐवज लंपास
वाकडी, ता. जामनेर: वाकडी येथे ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई सुरेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना ११ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या सुमारास घडली.
प्रवीण गायकवाड हे त्यांच्या बहिण रेखा समाधान देवरे (रा. जामडी) यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून घरात
प्रवेश केला आणि २ लाख रुपये रोख रक्कम व ४ ग्रॅम सोने असा ऐवज चोरून नेला. सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तत्काळ प्रवीण गायकवाड यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाकडीसह परिसरात पुन्हा एकदा चोरी व लुटमारीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या चोरीप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अंकुश जाधव तपास करत आहेत.