जळगावसामाजिक

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात परिचारिकांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात परिचारिकांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान

जळगाव : १२ मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद जळगाव येथील प. पु. सानेगुरुजी सभागृहात “गुणगौरव सोहळा” संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील परिचारिकांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

प्रास्ताविक विजया पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली तळेले यांनी केले. यानंतर प्रेमलता पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जागतिक परिचारिका दिन हा महान परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. त्यांना “नर्सिंग व्यवसायाची जननी” म्हणून ओळखले जाते. त्यांनी रुग्णसेवेला शिस्तबद्ध, शास्त्रशुद्ध आणि व्यावसायिक स्वरूप दिले. त्या पहिल्या महिला सांख्यिकी अभ्यासकांपैकी एक होत्या. त्यांचा डेटा-आधारित दृष्टिकोन आरोग्य प्रशासनासाठी क्रांतिकारी ठरला.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२५ ची थीम “त्वरित कृती” असून ती स्त्री-पुरुष समानतेसाठी तातडीची कारवाई करण्यावर भर देते. ही थीम सरकार, संस्था आणि लोकांना समान हक्क, शक्ती आणि संधी देण्यासाठी प्रेरणा देते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. भायेकर यांनी सांगितले की, सन १८५३ ते १८५६ दरम्यानच्या क्रीमियन युद्धात फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी दिलेली रुग्णसेवा अतुलनीय होती. त्यांनी आहार, स्वच्छता, हात धुण्याच्या पद्धती आदी बाबतीत जागरूकता निर्माण केली. त्यांच्या योगदानामुळे नर्सिंग केअरला व्यावसायिक आणि दर्जेदार स्वरूप मिळाले आहे. त्यांच्या शिकवणुकीच्या आधारे आपण ग्रामीण व शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा देत आहोत.

कार्यक्रमाला डॉ. करिष्मा जैन, जयश्री इखनकर, विद्या राजपूत, माधुरी कोचूरे, वैशाली दाणी, करुणा घोडेस्वार, सुजाता बागुल, सुवर्णा धनगर, अनिता मगर, वैशाली जाधव, शितल रोकडे, माया सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील शिंदे, जयश्री इखनकर, मिलिंद लोणारी, योगेश यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button