
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोंडणदिगर येथील ४९ वर्षीय शेतकरी नरेंद्र शिवाजी पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (२० मे) सकाळी उघडकीस आली.
या प्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी पारोळा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र पाटील यांनी चोरवड शिवारातील स्वतःच्या शेतात उंबराच्या झाडाला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास लक्षात आली.
नरेंद्र पाटील हे मागील काही काळापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले होते. या मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे