जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला; बाबा नगर परिसरातील घटना

जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला; बाबा नगर परिसरातील घटना
दोघांना अटक ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना जळगाव शहरातील बाबा नगर परिसरात घडली. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22 जून 2026 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बाबा नगर कंपाऊंड परिसरात फिर्यादी भारत अनिलकुमार कुकरेजा (वय 33, रा. टीएम नगर, कवर नगरजवळ, सिंधी कॉलनी, जळगाव) यांचा मित्र राहुल जयकुमार खिवलानी, हर्षल वाधवा व पियुष बालानी यांच्यासोबत गप्पा मारत उभा होता.
यावेळी आरोपी सुनील नियामत तडवी (रा. इच्छादेवीजवळ, जळगाव) व सतराज नितीन गायकवाड (रा. सबजेल मागे, जळगाव) हे तेथे आले. जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी राहुल खिवलानी याच्याशी शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर सतराज गायकवाड याने राहुलला पकडून ठेवले असता सुनील तडवी याने “आज तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत कमरेतील चाकू काढून राहुलच्या छातीच्या डाव्या बाजूस वार केला.
या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 566/2026 दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ करीत आहेत.




