मनपा शाळांमध्ये तीन दिवसांचा ‘खाऊ’ प्रयोग; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?

मनपा शाळांमध्ये तीन दिवसांचा ‘खाऊ’ प्रयोग; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?
बचत गटांना डावलून खाजगी ठेकेदाराकडून खाद्यपदार्थ वितरण; चौकशीची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका शाळांमधील शालेय पोषण आहार योजनेत झालेल्या कथित अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाच्या नियमानुसार बचत गट अथवा गरजू महिलांच्या माध्यमातून शिजवलेला पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक असताना, शहरातील अनेक मनपा शाळांमध्ये सलग तीन दिवस हा नियम धाब्यावर बसवून खाजगी ठेकेदारामार्फत खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे हा निर्णय नेमका कुणाच्या आदेशावर घेण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. शैक्षणिक वर्तुळात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तोंडी सूचनेवर हा संपूर्ण प्रकार राबविण्यात आल्याची चर्चा असून प्रशासन मात्र याबाबत मौन बाळगून आहे.
शिवाजीनगर, बळीराम पेठ येथील गंगूबाई शाळा, हिंदी शाळा, कंवरनगर सिंधी कॉलनी, आदित्य चौक, मेहरूण स्मशानभूमी परिसर, एमआयडीसी गृहकुल सोसायटी, पोलीस लाईन तसेच खेडी येथील मनपा शाळांमध्ये हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या पोषणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील योजनेत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अथवा आदेश न देता बदल करण्यात आल्याने पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या तीन दिवसांत वितरित करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि अन्न सुरक्षा मानकांची तपासणी करण्यात आली होती का, हा आहे.
समजा या खाद्यपदार्थांमुळे एखाद्या विद्यार्थ्याला अन्नातून विषबाधा झाली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची ठरली असती? संबंधित ठेकेदार, शाळा प्रशासन की तोंडी आदेश देणारा अधिकारी? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, माध्यमांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर प्रशासनाने तातडीने माघार घेत चौथ्या दिवसापासून पुन्हा बचत गटांमार्फत पोषण आहार तयार करून विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीचे तीन दिवस खाजगी ठेकेदारामार्फत खाद्यपदार्थ पुरविण्यामागील नेमका उद्देश काय होता, याबाबत संशय अधिकच बळावला आहे.
या प्रकरणात आर्थिक हितसंबंध किंवा देवाणघेवाणीची शक्यता असल्याचीही चर्चा सुरू झाली असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर निर्णयामागील खरा सूत्रधार कोण, याचे उत्तर मिळेपर्यंत हा ‘तीन दिवसांचा खाऊ प्रयोग’ जळगावमध्ये चर्चेचा विषय राहणार असल्याचे बोलले जात आहे.




