शासकीय

मासे दगावल्याच्या नावाखाली उद्योजकांना नाहक त्रास! मन्यारखेडा तलाव प्रकरण : सखोल चौकशी करण्याची मागणी

जळगाव मीडिया l प्रतिनिधी l तालुक्यातील मन्यारखेडा येथील तलावामध्ये मासे दगावल्याच्या कारणावरून परिसरा तील 16 उ‍द्योजकांना प्रशासनाकडून नाहक त्रास दिला जात आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून दि. 23/07/2026 रोजी मत्स उत्पादक अर्जदार साहेबराव माणिक सैंदाणे यांच्या तक्रारीवरून सन 2023 च्या कलम 152 अन्वये सुनावणी नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे स्थानिक उद्योजक व शेकडो कामगार तीव्र आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.

या संदर्भात उद्योजकांनी पत्रपरिषदेत आपल्या व्यथा मांडतांना सांगितले की,

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार सर्व उद्योजकांनी स्वखर्चाने ईपीटी मशिन बसवलेले असून कायदेशीर नियमांचे पूर्ण पालन करून उद्योग चालवले जात आहेत. मन्यारखेडा तलावामध्ये केवळ या उद्योगांचेच नव्हे तर कुसुंबा, रायपूर, साईनगर, सुप्रीम कॉलनी व परिसरातील जवळपास 500 ते 600 लहान-मोठ्या घटकांचे सांडपाणी येते. शिवाय तलावाच्या सभोवताली असलेली 200 ते 300 एकर वहिवाटीची शेती असून, पावसाळ्यात शेतात वापरलेली रासायनिक खते व कीटकनाशके वाहून तलावात येतात. याचा दुष्परिणाम माशांवर होत असण्याची दाट शक्यता असताना केवळ 16 उद्योजकांनाच टार्गेट का केले जात आहे? कारखाने व उद्योग वर्षभरात 12 महिने अविरत सुरु असतात. जर उ्‌‍‍द्योगांच्या पाण्यामुळे प्रदूषण होत असेल, तर मासे वर्षातून एकदाच कसे दगावतात? ठराविक काळातच मासे मरण्याचे दाखवून संगनमताने शासकीय अनुदान लाटण्याचा हा प्रकार तर नाही ना? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 12 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या तलावात फक्त 1 ते 2 टन मासे दगावण्यामागे नेमके काय कारण आहे, याचे खरे-खोटे समोर आले पाहिजे.

 

यावेळी उद्योजकांनी मन्यारखेडा तलावातील मासे दगावण्याच्या घटनेची निष्पक्ष तज्ज्ञांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, शासकीय अनुदान लाटण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर व या प्रकरणात सामील असणाऱ्या घटकांची चौकशी व्हावी, नियमांचे पालन करणाऱ्या 16 उद्योजकांवर होणारी एकतर्फी व अन्यायकारक कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी, उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या शेकडो कामगारांच्या रोजगाराचे रक्षण करून उद्योजकांना कायमस्वरूपी न्याय द्यावा या सर्व प्रकाराची वस्तुस्थिती (खरे-खोटे) समोर यावी अशी मागणी केली आहे. यावेळी उद्योजक रवींद्र फालक, संतोष इंगळे, मधुकर महाजन, दत्तु मराठे, रमेश सोनार, कैलास सोनवणे, कैलास पाटील, सतीलाल पाटील, संदीप वाघ, चंद्रकांत कोल्हे, संतोष कोळी, सत्तार शेख, अखिलेश उपाध्ये, उत्तम जैन, साहेबराव पटील, विजय चव्हाण, साबीर शाह, आवेश शाह, जितेंद्र पाटील, धिरज महाजन, भानुदास कोळी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button