
सौदी अरेबियाचा मोठा निर्णय: भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर तात्पुरती व्हिसा बंदी; कारण वाचा
रियाध (प्रतिनिधी): सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तानसह एकूण १४ देशांवर तात्पुरती व्हिसा बंदी लागू केली आहे. उमरा, व्यवसाय आणि कुटुंब भेटीच्या व्हिसावर ही बंदी आहे. हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे.
बंदी कोणत्या कारणामुळे?
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गर्दीचं व्यवस्थापन, अनधिकृत प्रवास थांबवणे आणि हज काळातील सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या हज यात्रेसाठी योग्य नोंदणीसह नियोजनबद्ध प्रवास सुनिश्चित करण्याचा उद्देश सरकारचा आहे.
उमरा व्हिसा धारकांसाठी अंतिम तारीख १३ एप्रिल ठरवण्यात आली आहे. या तारखेपर्यंतच संबंधित व्यक्तींना देशात प्रवेश मिळू शकतो. हे निर्बंध जून २०२५ पर्यंत लागू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षीचे धक्कादायक अनुभव
२०२४ मध्ये हज यात्रेदरम्यान तीव्र उष्णतेमुळे अनेक यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात काही यात्रेकरूंनी अधिकृत नोंदणी न करता देशात प्रवेश केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अव्यवस्थित गर्दी, रस्त्यावर अडथळे आणि अपुऱ्या सुविधा यामुळे सरकारवर टीका झाली होती.
सौदी सरकारकडून स्पष्ट संदेश
या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अधिकाऱ्यांना कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार देशात अनधिकृत प्रवाशांचा शिरकाव रोखण्यासाठी आणि पवित्र स्थळांच्या सुरक्षिततेसाठी ही तात्पुरती व्हिसा बंदी लागू करण्यात आली आहे.
लक्षात ठेवा:
उमरा व्हिसा असलेल्यांनी १३ एप्रिलपूर्वी देशात प्रवेश करावा.
नवीन व्हिसा अर्जावर तात्पुरती स्थगिती आहे.
हजसाठी अधिकृत मार्गाने आणि योग्य नोंदणीसहच प्रवास करावा, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.