
जळगावात मेहरूण तलावात मासेमारी करताना प्रौढाचा बुडून मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील मेहरूण तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी दुपारी घडली, तर बुधवारी, १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव काझी अब्दुल वाहिद रईस अहमद (वय ४५, रा. फातिमा मस्जिद परिसर, मेहरूण, जळगाव) असे आहे. ते मशिदीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे आई आणि पत्नी असा परिवार आहे.
प्राप्त माहितीनुसार, अब्दुल वाहिद मंगळवारी दुपारी मेहरूण तलावात मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करताना त्यांचा पाय घसरला आणि ते तलावाच्या खोल पाण्यात पडले. यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर बुधवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह तलावात आढळला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी तो जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.