गुन्हेजळगाव

राज्यातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे-मुंबईत फेरबदल

राज्यातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे-मुंबईत फेरबदल

मुंबई वृत्त संस्था l महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यामध्ये काहींना पदोन्नती, तर काहींच्या जबाबदाऱ्या बदलून नव्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे पुणे आणि मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल झाले आहेत.

पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखेच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 येथे समादेशक म्हणून नियुक्ती झाली आहे. यासोबतच पुणे पोलिस यंत्रणेत तीन नवीन आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे आणि परिमंडळ 2 च्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांची बदली झाली असून, स्मार्तना पाटील यांना खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले आहे.

मुंबईत 5 नवे डीसीपी

मुंबई पोलिस दलातही मोठे बदल घडले आहेत. पाच आयपीएस अधिकाऱ्यांची पोलीस उपायुक्त (DCP) पदावर नियुक्ती झाली आहे. यामध्ये तुषार पाटील (माजी कोल्हापूर पोलीस अधीक्षक), विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे मुंबई पोलिस दलाला नवे नेतृत्व मिळाले आहे. तसेच, स्तंभ दोनमध्ये कार्यरत असलेले महेंद्र पंडित यांची बदली स्तंभ तीन अंतर्गत बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे.

आयएएस बदल्यांची मालिकाही सुरू

पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणेच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याही गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. गेल्या 15 दिवसांपूर्वी 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, तर गेल्या आठवड्यात आणखी 4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यामध्ये पराग सोमन यांची मुंबई मेट्रो झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तसेच, अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांना पुणे येथील यशदा उपसंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.

प्रशासनात सातत्याने बदल

राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत सातत्याने होणाऱ्या या बदल्यांमुळे प्रशासनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुणे आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांतील हे फेरबदल पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणतील, असा विश्वास प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button