
गुरुनानक नगरात तलवारीने दहशत, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गुरुनानक नगर परिसरात एका युवकाने हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी ओंकार योगेश सोनवणे (वय २१, रा. रिधूरवाडा) याच्याविरुद्ध शनी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास गुरुनानक नगर भागात आरोपी सोनवणे याने हातात तलवार घेऊन फिरत असताना स्थानिक नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. काहींनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेता शनी पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सहायक फौजदार रघुनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.