शहरातील कुख्यात गुन्हेगारांना आज पहाटे चार वाजता पोलिसांचा गुड मॉर्निंग

जळगाव मीडिया | वसीम खान | पहाटे ४ वाजता, जेव्हा जळगाव शहर गाढ झोपेत होते, तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरात चक्रव्यूह रचले आणि गुन्हेगारी विश्वाला हादरवणारे कोम्बिंग ऑपरेशन राबवले. आगामी सणोत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या अचानक कारवाईने हद्दपार गुंड आणि पाहिजे असलेले कुख्यात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे, काही संशयितांकडून धारदार शस्त्रे देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
पहाटेच्या शांततेत पोलिसांनी जळगाव शहर, जिल्हापेठ, तालुका, रामानंद, एमआयडीसी, शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत शहराच्या कानाकोपऱ्यात एकाचवेळी धडक कारवाई केली. गल्लीबोळांपासून ते संशयास्पद ठिकाणांपर्यंत, पोलिसांनी कसलीही कसर सोडली नाही. या ऑपरेशनमध्ये अनेक कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. पकडलेल्या आरोपींना थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले, जिथे सध्या त्यांची ओळख परेड आणि कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या या झटपट कारवाईने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
सण आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक पावले
“सणासुदीचा काळ आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुरक्षा राखणे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारीला आळा बसेल आणि नागरिकांना निर्भय वातावरण मिळणार आहे. या ऑपरेशनमुळे जळगावातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत आहे.
जळगाव पोलिसांचा हा धडाका गुन्हेगारीला खीळ घालण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यापुढेही पोलिसांचा हा ‘ऑपरेशन धडक’ कायम राहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.