
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करताना तहसीलदारांचे वाहन उलटले
विदगाव तापी नदीपात्रात घडली घटना;
यावल प्रतिनिधी तालुक्यातील तापी नदीच्या पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी गुरुवारी यावलचे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या नेतृत्वाखाली धाडसी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान त्यांचे शासकीय वाहन उलटले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विदगाव परिसरात अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर भरधाव वेगात जात असल्याचे लक्षात येताच तहसीलदार नाझीरकर यांनी पथकासह पाठलाग सुरू केला. पाठलाग करताना त्यांच्या वाहनाचा (MH 19 CV 0419) चालकाचा ताबा सुटला आणि ते थेट तापी नदीच्या पात्रात उलटले. या अपघातात तहसीलदार आणि त्यांच्या पथकातील सदस्य थोडक्यात बचावले, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉ. उमा ढेकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले. प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर चालक आणि इतर जबाबदार व्यक्तींविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.