राष्ट्रीय

उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे लंडनला पोहोचले, पण OSD-फोटोग्राफरसह सहा जण झ्युरिकला! विमानात तांत्रिक बिघाड

जळगाव मीडिया प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय लंडन दौऱ्यावर असून, ब्रिटिश संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमांमध्ये त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. मात्र, या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना विमानाच्या तांत्रिक अडचणीचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD आणि फोटोग्राफरसह सहा अधिकाऱ्यांचे विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळाऐवजी स्वित्झर्लंडमधील झ्युरिक विमानतळाकडे वळवण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

लंडनला जाण्याऐवजी विमान झ्युरिकमध्ये उतरल्याने उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची काही काळ गैरसोय झाली. झ्युरिकमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांना लंडनला पोहोचवण्यासाठी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुढील व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने प्रवास करत असून त्यांचे विमान नियोजित वेळेनुसार लंडनला पोहोचल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेंच्या दौऱ्याच्या कार्यक्रमावर या घटनेचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

 

ब्रिटिश संसदेत शिंदेंचा होणार सन्मान

 

9 सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि कॅनव्हास फॉर केअर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

शिंदे यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांसारख्या लोककल्याणकारी उपक्रमांची दखल घेत हा सन्मान देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमादरम्यान ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ आणि ‘शासन आपल्या दारी’ योजनांच्या संकल्पनेवर आधारित तयार केलेली चित्रेही संसदीय कला प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

 

10 सप्टेंबरला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कार्यक्रम

 

10 सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या वतीने ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026 : ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ आयोजित करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, यावेळी त्यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि भारत-यूके आर्थिक संबंध याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

 

दरम्यान, शिंदेंच्या लंडन दौऱ्यादरम्यान त्यांच्या OSD आणि फोटोग्राफरसह सहा अधिकाऱ्यांचे विमान तांत्रिक कारणामुळे झ्युरिकला वळवण्यात आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button