
गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी मेहरून तलावावर अग्निशमन दल सज्ज; थरारक रंगीत तालीम संपन्न!
जळगाव: बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी खान्देशची सुवर्णनगरी जळगाव सज्ज झाली असून, मेहरून तलावाच्या गणेश घाटावर सुरक्षेचा एक थरार पाहायला मिळाला! विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांचा उत्साह निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी जळगाव शहर महानगरपालिका अग्निशमन दल आणि वन्यजीव संरक्षण संस्थेने संयुक्तपणे ‘शोध व बचाव कार्याची’ थरारक रंगीत तालीम (मॉकड्रिल) यशस्वीरीत्या पार पाडली.
महानगरपालिका आयुक्तांच्या विशेष आदेशानुसार ही धडक मोहीम आखण्यात आली होती.
रबर बोटचा थरार आणि जलद बचावकार्य
मेहरून तलावाच्या संथ पाण्यात जेव्हा OBM रबर बोट अतिशय वेगाने धावली, तेव्हा उपस्थितांच्या नजरा खिळल्या. पाण्यात कोणी संकटात सापडल्यास त्याला कमीत कमी वेळेत कसे बाहेर काढायचे, बोटीचे नियंत्रण कसे करायचे आणि आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षक उपकरणांचा वापर कसा करायचा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक जवानांनी सादर केले.
अनुभवी जवानांची ‘वॉटर मिशन’ तयारी
मुख्य अग्निशमन अधिकारी मा. अश्वजीत घरडे यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सराव पार पडला. केंद्र अधिकारी भारत बारी यांच्यासह अनुभवी वाहनचालक आणि फायरमनच्या टीमने या मोहिमेत तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन केले.
अग्निशमन दल टीम: देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, निवांत इंगळे, अजय पाटील, प्रदीप धनगर, तेजस जोशी, गिरीश खडके, ऋषभ सुरवाडे, केतन पाटील, विकी सोनवणे, नितीन ससाने व रजनीश भावसार.*
*वन्यजीव संरक्षण संस्था: सचिव योगेश गालफडे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, अजीम काझी सर, प्रदीप शेळके, रामलाल बोरसे, दिनेश सपकाळे, गोकुळ पाटील व राजू गुप्ता.*
भाविकांनी निर्धास्त राहावे!
“बाप्पाला निरोप देताना भाविकांची सुरक्षा हीच आमची पहिली प्राथमिकता आहे,” असा विश्वास प्रशासनाने दिला आहे. मेहरून तलाव परिसरात अत्याधुनिक साधनसामग्री आणि प्रशिक्षित जवानांचे पथक २४ तास खडा पहारा देणार आहे. त्यामुळे यंदाचा विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडणार हे निश्चित!



