
नववर्षात शिवसेनेची झेप; सलग दुसरे बिनविरोध यश
प्रभाग ९ ‘अ’ मधून शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी बिनविरोध
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीने शानदार सुरुवात केली आहे. प्रभाग ९ ‘अ’ मधून शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, महायुतीसाठी हे सलग तिसरे यश ठरले आहे. अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असून महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे.
निवडणुकीच्या या प्रक्रियेत महाविकास आघाडीची ताकद अद्याप कुठेही प्रभावीपणे जाणवत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. महायुतीमधील नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा सिलसिला बुधवारी संध्याकाळपासून सुरू झाला. प्रभाग १२ ‘ब’ मधून भाजपच्या उज्ज्वलाताई बेंडाळे या पहिल्या बिनविरोध उमेदवार ठरल्या. त्यानंतर गुरुवारी सकाळी प्रभाग १८ ‘अ’ मध्ये अपक्ष उमेदवार चंद्रशेखर सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
यशाचा हाच प्रवाह दुपारी २ वाजेच्या सुमारास प्रभाग ९ ‘अ’ मध्येही पाहायला मिळाला. येथे अपक्ष उमेदवार राहुल अशोक लोखंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांची निवड निश्चित झाली आहे. आता केवळ प्रशासकीय घोषणेची औपचारिकता बाकी असली, तरी मनोज चौधरी आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिकेत जल्लोष साजरा करत विजयाचा गुलाल उधळला. नववर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या सलग यशामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.




