
शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास लावून आयुष्य संपवले
धरणगाव शहरातील रामलीला चौक परिसरात राहणाऱ्या गिरीष सुकदेव माळी (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने मंगळवार, २७ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिरीष माळी हा पत्नी कविताबाई, आई आशाबाई, वडील सुकदेव माळी आणि दोन मुले मयुरेश (१२) व कार्तिकी (९) यांच्यासह वास्तव्याला होता. गिरीष व त्याचा भाऊ स्वप्नील हे दोघे मिळून धरणगाव शिवारातील शेती करीत होते.
मंगळवारी सकाळी ११ वाजता दोघेही गट नंबर ६६ मधील शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. दुपारी १ वाजता गिरीषने ‘पाणी पिऊन येतो’ असे सांगत विहिरीकडे गेला, मात्र बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही. त्यानंतर स्वप्नीलने शोध घेतला असता गिरीष विहिरीजवळ झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर शेजारील शेतकरी कडू रुपा महाजन, गिरधर संखाराम महाजन आणि चुलत भाऊ विजय महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मिळून गिरीषला खाली उतरवून खासगी ॲम्बुलन्सद्वारे धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गिरीषने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.