ब्रेकिंग न्यूज : एमआयडीसीमध्ये बेछूट गोळीबार; एक गंभीर जखमी, दुसऱ्यावर उपचार सुरू आहे

जळगाव मीडिया । वसीम खान । जळगाव शहरातील एमआयडिसी परिसरातील जी सेक्टरमध्ये असलेल्या विजेता इंडस्ट्रीज कंपनीबाहेर मध्यरात्री झालेल्या गुंडागर्दीच्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीतील कर्मचारी सरफू शेख नाईट ड्यूटी संपवून घरी जात असताना ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सरफू शेख हे कंपनीबाहेरील एका टपरीवर पान-बीडी घेण्यासाठी थांबले असता, शेजारील दुसऱ्या अवैध दारू विक्री टपरीवर राहुल नावाचा तरुण एकास मारहाण करत होता. यावेळी तोच राहुल सरफू यांच्यावरही धावून गेला आणि त्याला मारहाण सुरू केली. झालेल्या वादावादीनंतर सरफू शेख यांनी कंपनीतील इतर कामगारांना मदतीसाठी बोलावले.
कंपनीतील कामगार बाहेर येताच राहुल आणि त्याच्या साथीदारांनी लाठ्या-काठ्यांसह हल्ला सुरू केला. या दरम्यान, घटनास्थळी असलेल्या एका महिलेने राहुल याला बंदूक दिल्याचे समोर आले असून, राहुल याने बेछूट गोळीबार सुरू केला.
गोळीबारात अहमद फिरोज शेख (वय ३६) आणि राजन शेख रफिउल्ला हे दोघे कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे हॉस्पिटल सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, हल्लेखोर अजूनही कंपनीच्या परिसरातच थांबले असल्याने कंपनीतील कामगार भीतीपोटी आत लपून बसले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाकडे धाव घेतली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
रुग्णालयात माजी उपमहापौर करीम सालार यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. पोलिसांनी संबंधित आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी काही रिकामे काडतूस आणि १ जिवंत काडतूस मिळून आल्याचे समजते.
				



