
महायुती भक्कम ; शिवसेना शिंदे गटाचा विजयरथ वेगात
प्रभाग ९ ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख बिनविरोध; शिवसेनेची ‘हॅट्ट्रिक’ !
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या बिनविरोध निवडींच्या मालिकेत गुरुवारी आणखी एक भर पडली असून, प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधून शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे महापालिकेत महायुतीचे चौथे, तर शिवसेना शिंदे गटाचे सलग तिसरे यश नोंदवले गेले आहे.
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत निवडणूक रणांगणात आपली पकड मजबूत केली आहे. प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ (अनुसूचित जमाती राखीव) मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड सर्वप्रथम निश्चित झाली. या प्रभागात प्रतिस्पर्धी उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्याने हा विजय निर्विवाद ठरला.
यानंतर प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मधून शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांच्या विरोधात असलेल्या एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे चौधरी यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या सलग यशानंतर दुपारी प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधील राजकीय गणितेही बदलली. येथे अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
शिवसेनेचे सलग तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महापालिका परिसरात जल्लोष करण्यात आला.
दरम्यान, महायुतीतील भाजपनेही आधीच आपले खाते उघडले आहे. भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत महायुतीचे एकूण चार उमेदवार निर्विरोध विजयी ठरले असून, प्रत्यक्ष मतदानाआधीच महायुतीने जळगाव महापालिकेच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे दिसून येत आहे.




