
रिक्षामधून अज्ञात महिलेने वृद्ध महिलेची 25 ग्रॅम सोन्याची पोत लांबवली !
जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : जळगाव बस स्थानकापासून नवीपेठ या मार्गावर रिक्षाने प्रवास करताना ६५ वर्षीय महिलेच्या पर्समधून २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात महिलेने लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. ३ जून) सकाळी घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.लिलाबाई ताराचंदजी टाटिया (वय ६५, रा. सुशिला नगर, साक्री, जि. धुळे) या सध्या माहेरी जळके (ता. पाचोरा) येथे आल्या होत्या. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्या जळगाव बस स्थानकावर उतरल्या. गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगल पोत तुटल्याने ती दुरुस्तीसाठी त्या आपली बहीण प्रेमलता चोपडा आणि वहिनी संगीता जैन यांच्यासह नवीपेठेतील महावीर ज्वेलर्सकडे रिक्षाने निघाल्या.बस स्थानकावरून रिक्षात बसताना त्यांच्यासोबत एक अनोळखी महिला देखील बसली होती. महावीर ज्वेलर्स येथे पोहोचल्यानंतर दुकानात गेल्यावर लिलाबाई यांनी पर्स तपासली, तेव्हा पर्सची चैन उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पर्समध्ये ठेवलेली सोन्याची पोत गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला.या घटनेनंतर लिलाबाई यांनी तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वीरेंद्र शिंदे करत आहेत.