गुन्हेजळगावधार्मिक

चाळीसगावात दोन मंदिरांना चोरट्यांचा डल्ला; ६१ हजारांचा ऐवज लंपास!

चाळीसगावात दोन मंदिरांना चोरट्यांचा डल्ला; ६१ हजारांचा ऐवज लंपास!

महादेव मंदिरातील तांब्याच्या वस्तूंसह दोन्ही मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या

चाळीसगाव, प्रतिनिधी : शहरातील वामन नगर, करगाव रोड परिसरातील मारुती मंदिर आणि महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी महादेव मंदिरातील तांब्याच्या धार्मिक वस्तूंसह दोन्ही मंदिरांतील दानपेट्या चोरून नेल्या. या घटनेत एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी संदीप अशोक लांडगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता ते मंदिर परिसरातून घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन्ही मंदिरांचे दरवाजे उघडून चोरी केली.

३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता लांडगे दर्शनासाठी मंदिरात गेले असता महादेवाच्या पिंडीजवळील तांब्याचा नाग, तांब्याची घागर आणि दानपेटी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मारुती मंदिरात पाहणी केली असता तेथील दानपेटीदेखील चोरीला गेल्याचे आढळून आले.

चोरीस गेलेल्या ऐवजात तीन हजार रुपये किमतीचा तांब्याचा नाग, आठ हजार रुपये किमतीची तांब्याची घागर, महादेव मंदिरातील दानपेटीतील १० हजार रुपये आणि मारुती मंदिरातील दानपेटीतील ४० हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

धार्मिक स्थळांमध्ये झालेल्या या चोरीमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button