गुन्हेजळगाव

समतानगरात दारूच्या पैशांवरून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

समतानगरात दारूच्या पैशांवरून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

डोक्यावरचा वार हाताने अडविल्याने मनगट गंभीर जखमी; दोघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव, प्रतिनिधी : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून समतानगरातील तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वंजारी टेकडी परिसरात घडली. दीपक साहेबराव सोनवणे असे जखमी तरुणाचे नाव आहे. डोक्यावर कोयत्याने वार केला जात असताना तो हाताने अडविण्याच्या प्रयत्नात त्याच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी अभिजीत उर्फ मॉन्टी अनिल भालेराव आणि किशोर भगवान बाविस्कर (दोघे रा. समतानगर) यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक सोनवणे हे मिस्तरी काम करून उदरनिर्वाह करतात. १० ऑक्टोबर रोजी रात्री जेवण झाल्यानंतर ते शेजारी राहणारे राजू सोनवणे यांच्यासोबत परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ बसले होते. त्यावेळी अभिजीत भालेराव आणि किशोर बाविस्कर हे दोघे तेथे आले. त्यांनी दीपक यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, दीपक यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांना शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

डोक्यावरचा वार हाताने अडविला

वाद वाढल्यानंतर अभिजीत भालेराव याने दीपक यांना उद्देशून, ‘तू जास्त मातला आहेस, आज तुला मारूनच टाकतो,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने कमरेला लावलेला कोयता काढून दीपक यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार चुकविण्यासाठी दीपक यांनी हात आडवा केल्याने कोयता त्यांच्या मनगटाला लागला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले.

दारूच्या पैशांवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झाल्याने समतानगर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button