गुन्हेजळगाव

रावेरमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ ; गांधी चौकातील तीन दुकानांमध्ये चोरी

रावेरमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ ; गांधी चौकातील तीन दुकानांमध्ये चोरी

रावेर (प्रतिनिधी) – रावेर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा गांधी चौक परिसरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी चार दुकानांवर धाडसी हल्ला चढवून शहरात खळबळ उडवून दिली. या घटनांमध्ये तीन दुकानांमधून चोरी झाली असून, चौथ्या दुकानाचे कुलूप तोडले गेले तरी चोरी टळल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पहिली घटना महेंद्र ताराचंद्र लोहार यांच्या ‘न्यू मनोज जनरल स्टोअर्स’मध्ये घडली. दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम व माल लंपास केला. दुसऱ्या घटनेत शेख सादिक यांच्या ‘युनिक किराणा स्टोअर’चे शटर वाकवून आतील साहित्याची चोरी करण्यात आली. तिसऱ्या घटनेत भूषण कोळी यांच्या ‘महादेव मेडिकल’चे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील काही औषधसाठा चोरून नेल्याचे समजते. चौथ्या घटनेत शरीफभाई पन्नीवाले यांच्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले असले तरी कोणतीही चोरी झाली नाही.

या प्रकाराची माहिती सकाळी उघड होताच परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. काही जागरूक नागरिकांनी सांगितले की, रात्री १२ ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान शहरात वाळू तस्करांचे वाहनांनी वारंवार फिरणे सुरू असते. त्यामुळे अशा वेळी रस्त्यांवर दिसणाऱ्या अनोळखी लोकांकडे संशयाने पाहण्याऐवजी त्यांना वाळू तस्कर समजून दुर्लक्ष केले जाते. चोरट्यांनी याचाच फायदा घेत चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढवावी, तसेच वाळू तस्करांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांनी सर्व घटनांची नोंद घेत तपास सुरू केला असून चोरट्यांचा लवकरच छडा लावला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button