
मद्यसाठा चोरी प्रकरणी मुख्य संशयीताच्या छत्रपती संभाजी नगरमधून आवळल्या मुसक्या
तीन फरार संशयितांचा शोध सुरू ; जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई
जळगाव – इच्छादेवी चौकातील अशोका लिकर गॅलरी या मद्यविक्रीच्या दुकानातून १० लाख रुपये किमतीचा मद्यसाठा चोरीस गेल्याच्या प्रकरणाचा गुन्हा उलगडत जिल्हा पेठ पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून सलीम उमर पठाण (वय ३५, रा. पडेगाव) या मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात आणखी तीन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत.
२३ एप्रिल रोजी इच्छादेवी चौकातील पोलिस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या अशोका लिकर गॅलरी या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दारूचे अनेक बॉक्स चोरून नेले होते. चोरी झाल्यानंतर दुकानचालकाच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीसांनी तांत्रिक माहिती आणि वाहनांची तपासणी करत पडेगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील सलीम उमर पठाण याच्यावर संशय घेतला. तपासात समोर आले की, पठाण याने भाडेतत्त्वावर चारचाकी वाहन घेतले आणि त्याद्वारे चोरलेला मद्यसाठा छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचवला.
त्यानंतर तिथून तो मालेगावमधील इतर चोरट्यांच्या मदतीने दुसऱ्या वाहनात चढवून स्थलांतरित करण्यात आला. संपूर्ण प्रकरणात चोरीपूर्व नियोजनाचे स्पष्ट संकेत तपासातून मिळाले आहेत.
सलीम पठाणला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून वापरलेले वाहन जप्त केले असून, आणखी तीन संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.