
भुसावळ: बनावट आधार कार्डसह दोन बांगलादेशी महिलांना अटक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसून, बनावट आधार कार्ड आढळल्याने पोलिसांनी त्या दोघींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानिया अहमद (वय २६) आणि करीमा अख्तर (वय २२) या बांगलादेशी महिलांनी रेल्वेमार्गे भारतात प्रवेश केला. भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्या जामनेर रोडवरील ‘हॉटेल अतिथी’ येथे थांबल्या. हॉटेल व्यवस्थापनाने ओळखपत्र मागितले असता, त्यांनी आधार कार्डच्या झेरॉक्स कॉपी सादर केल्या. मात्र, मूळ कागदपत्रे दाखवण्यास असमर्थता दर्शवल्याने हॉटेल व्यवस्थापनाचा संशय बळावला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तपासादरम्यान महिलांनी मुंबईतील एका ‘दीदी’कडे कामासाठी जात असल्याचे सांगितले. पुढील तपासात जलाल आणि सैफुल या दोघांनी बनावट आधार कार्ड तयार करून दिल्याचे उघड झाले. पोलिसांनी तानिया, करीमा आणि संबंधित दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महिलांच्या भारतातील प्रवेशामागील उद्देश आणि इतर संशयितांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.