
गोलाणी मार्केटमध्ये भरदुपारी थरार! जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला
पोलीस हवालदाराच्या प्रसंगावधानामुळे वाचले तरुणाचे प्राण; हल्लेखोर ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये बुधवारी दुपारी जुन्या वादाची परिणती रक्तरंजित संघर्षात झाली. एका २५ वर्षीय तरुणाने १८ वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने बाजारपेठेत कामानिमित्त आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने देवदूतासारखे धावून येत हल्लेखोराला जागेवरच पकडले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकरराव नगरमधील रहिवासी आणि देवकर महाविद्यालयाचा डिप्लोमाचा विद्यार्थी साई गणेश बोराडे (वय १८) हा बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट परिसरात आला होता. याचवेळी तेथे दबा धरून बसलेला संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौगुले प्लॉट) याने साईला पाहताच त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. शुभमने साईच्या शरीरावर उजव्या आणि डाव्या बाजूला गंभीर वार केले.
पोलीस हवालदाराची तत्परता
ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार रमेश बाबुलाल चौधरी हे मोबाईलच्या कामासाठी मार्केटमध्ये आले होते. आरडाओरड ऐकताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता हल्लेखोराच्या दिशेने धाव घेतली. चौधरी यांनी जिवाची पर्वा न करता शुभमला झडप घालून पकडले आणि त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्यांच्या या धाडसामुळे साईवर होणारे पुढील वार थांबले आणि त्याचे प्राण वाचले.
घटनेनंतर जखमी साईला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आरोपी शुभम सोनवणे याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.




